डॉ. वैजनाथ अनमुलवाड

आदिवासी : मन्नेरवारलू आणि जमातवास्तव
डॉ. वैजनाथ अनमुलवाड
भारतात वैदिक काळापासून जात, धर्म, वंश, पंथ, प्रथा, परंपरा, संप्रदाय, इ. सनातनी संकल्पना पिढीगत चालत आलेल्या आहेत. काळानुरूप या संकल्पना मानवी जीवनात, व्यवहारात आणि संस्कृतीत अविभाज्य बनत गेल्या. एवढेच नाही तर, भारतीय समाजजीवनाच्या मानसिकतेत कायमस्वरूपी द्वैतभाव निर्माण होण्यास ह्याच संकल्पना कारणीभूत ठरत गेल्या असल्याची पार्श्वभूमी व्यापक आहे. त्यामुळे समाजात जातीय उतरंडं वाढली. समाजात द्वैतभाव निर्माण करणाऱ्या संकल्पनांची उत्तरोत्तर वाढ होत गेली. या संकल्पनांची भारतीय समाजात सोयीनुसार विभागणी होत गेली. त्यामुळे समाजमनात भेदभावाची कधी न भरून निघणारी दरी निर्माण झाली. ही दरी चातुर्वर्ण्याधिष्ठीत समाजव्यवस्थेमुळे अधिकच रुंदावत गेली. जातीय आणि वर्गीय भावना दृढ होत गेल्या. त्यामुळे समाजमनात ‘स्व’ जात, ‘स्व’ धर्म, ‘स्व’ संस्कृती, ‘स्व’ भाषा, ‘स्व’ देश ‘स्व’ प्रदेश, अशा वेगवेगळ्या ‘स्व’ पणाविषयीचा अतिरिक्त मोह निर्माण होत गेला. परिनामतः समाजात कधी न संपणारे सामाजिक विघटन वाढत गेले.
आजही भारतीय समाजात सामाजिक तथा सांस्कृतिकदृष्ट्या फारसे ऐक्य आहे असे सांगता येत नाही. जाती-जमातींमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक इत्यादीबाबत दुरी निर्माण करणारी उच्च-निच्चतेची भावना प्रबळ होत गेली. ही भावना समाजात वावरणाऱ्या माणसाच्या मनात कुठेतरी खोलवर दडलेली आहे. त्यामुळे भारतीय समाज विषमतेच्या खाईत अधिकच लोटला जात आहे. भेदाभेद आणि वर्ण्यव्यवस्थेच्या जात्यात भरडला जात आहे. सारांश, भारतातील जातवास्तव भयंकराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याप्रकारच्या जातवास्तवाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजच्या पिढीने समाजात सर्व पातळ्यांवर सामाजिक बांधिलकी प्रस्तापित करण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.
‘आदिवासी : मन्नेरवारलू आणि जमातवास्तव’ या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना प्रामुख्याने ‘मन्नेरवारलू’ समाज, संस्कृती, भाषा, इतिहास, प्रथा, परंपरा, संस्कार, राहणीमान, जीवनपद्धती, व्यवहार, व्यवसाय, लोकाविष्कार, कला, क्रीडा, सणवार, विधी, उत्सव, जत्रा, यात्रा, इत्यादी बाबी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदर चर्चा खालील घटकांच्या आधारे करण्यात येणार आहे.
मन्नेरवारलू जमातीच्या संदर्भाने उपलब्ध असलेली माहिती.
मन्नेरवारलू जमातीतील स्त्री, पुरुष, अनुभवी व्यक्ती आणि ज्येष्ठांच्या मुलाखती.
मन्नेरवारलू जमातीत प्रचीलीत असलेल्या दंतकथा, लोककथा, उत्पत्तीकथा, पुराणकथा इ.
मन्नेरवारलू जमातीची मौखिक परंपरा किंवा सामाजिक लोकोक्तीतून पिढीगत चालत आलेली माहिती.
चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, संगीत, श्रमाविष्कारातील कलाभिव्यक्ती आणि भाषाशैली इ.
एम. फील., पीएच.डी. किंवा अन्य संशोधनाकरिता महाराष्ट्रातील आदिवासी ‘मन्नेरवारलू’ जमातीच्या संदर्भाने विविध विद्यापीठांमध्ये संशोधक, अभ्यासकांनी सादर केलेल्या शोधप्रबंधांचा आधार व इतर उपलब्ध साधनसामुग्री इ.

महाराष्ट्रातील आदिवासी मन्नेरवारलू जमात :
अनु. जाती व जमातीचा आदेश सुधारणा कायदा, १९७६ (१९७६ चा १०८) चे महाराष्ट्र राज्यातील अनु. जमातीच्या यादीत एकूण ४७ जमातींचा समावेश आहे. त्यापैकी अ. क्र. २७ वर कोलाम, मन्नेरवारलू अशा दोन जमातींचा उल्लेख आहे. कोलाम आणि मन्नेरवारलू या दोन जमातींमध्ये (,) आहे. त्यामुळे या दोन जमाती भिन्न असल्याचे मा. उच्च न्यायालयाने अनेकवेळा स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे मन्नेरवारलू ही जमात कोलामांची पोटजमात, उपजात, तेलुगु भाषिक नाव किंवा कोणत्याही प्रकाराचे नामसाधर्म्य नसून ती एक स्वतंत्र आदिवासी जमात आहे. असे ‘मन्नेरवारलू’ जमातीच्या सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक इत्यादी वैशिष्ट्यांवरून आणि ऐतिहासिक वाटचालीवरून निदर्शनात येते.
‘मन्नेरवारलू’ संज्ञा :
महाराष्ट्रात ‘मन्नेरवारलू’ ही संज्ञा स्वातंत्र्यपूर्व काळापासून रूढ असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. निजामकालीन महसुली व्यवहारात मन्नेरवारलू असा स्पष्ट उल्लेख असल्याचे पुरावे या समाजातील अनेक लोकांकडे आहेत. ही जमात प्राचीन काळापासून गोदावरी नदीच्या किनाऱ्यालगतची जमीन धरून वसलेली आहे. असे त्यांच्या स्थानिक अथवा भौतिक इतिहासावरून स्पष्ट होते. बहुतांश आदिवासी जमाती ह्या एकतर घनदाट जंगलात, जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा नदीच्या काठालगत वसलेल्या असतात.
महाराष्ट्रातील आदिवासी मन्नेरवारलू जमात देखील गोदावरी नदीच्या दक्षिण भागात मराठवाड्याच्या औरंगाबाद, परभणी, नांदेड. कर्नाटकाच्या काही भागात. तेलंगणातील निजामाबाद, आदिलाबाद, करीमनगर आणि हौद्राबाद इ. जिल्ह्यांमध्ये वसलेली आहे. या जमातीच्या ऐतिहासिक वाटचालीविषयी डॉ. व्यंकटेश नुले म्हणतात- “ प्रथम ही जात निजाम सरकारच्या अंमलाखाली राहात होती. पुढे निजामाच्या पाडावानंतर तीनशे कुटुंबांचा एक काफिला (गट) हैद्राबादला स्थलांतरित झाला. तीनशे म्हणजे तेलुगु भाषेत मुरनुरू पुढे त्याचे मुन्नुर – मुन्नुरवार झाले आणि त्याला अनेकवचनी ‘लु’ प्रत्यय लागून ‘मुन्नेरवारलू- मन्नेरवारलू’ असा आदरार्थी बहुवचनार्थ शब्द बनला. तेलुगु भाषेत बहुवचनाकरिता आदरार्थी म्हणून ‘लू’ हा प्रत्यय लावला जातो. उदा. आकुल म्हणजे पान आणि या जमातीतील काही परिवारांचे हे आडनाव आहे. त्यांना आदरार्थी बोलाविताना आकुल ऐवजी आकुलोलू म्हणतात. ( तसेच वालुविलू म्हणजे हे ते ! एकवचनी ‘डू’ आणि अनेक वाचनी ‘लू’ ) कन्नडमध्ये आप्पा, मराठीत राव, हिंदीत जी जसे आदरार्थी म्हणून नावापुढे लावले जाते तसे तेलुगुत ‘लू’ लावतात.” भारतीय जातीजमाती आणि मन्नेरवारलू, अखिल महाराष्ट्र मन्नेरवारलू संघटन, प्रथम अधिवेशन ६ फेब्रु. १९८३, नांदेड.
मन्नेरवारलू ही संज्ञा रूढ होण्यापूर्वी या जमातीविषयी अनेक शब्दविपर्यास झाल्याचे आढळते. उदा. मुन्नेवार, मुन्नूरवार, मुन्नूरवाड, मुन्नेलू, मुनुरोल्लू, मुन्नूर, तेलुगु मुन्नुर, मुन्नुरवार तेलुगु, मुन्नूरकापू, कापेवार, तेलुगु कापेवार, तेलुगु फुलमाळी, मन्नेरवार अशा विविध शब्दांनी संबोधण्यात येत असे. यासारख्या अपभ्रंशातून अंतिमतः ‘मन्नेरवारलू’ हा शब्द निर्माण झाला असावा. असे प्रस्तुत लेखकाला वाटते. कारण भारतात निरनिराळ्या भागात वास्तव्य करणाऱ्या अनेक जाती, जमाती आहेत. त्यांच्या पोट जमाती आहेत. या जाती किंवा पोट जमातींना त्यांच्या धंद्यावरून अशी निरनिराळी नावे पडली असल्याचा सामाजिक इतिहास सांगतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मन्नेरवारलू जमातीच्या बाबतीत वरीलप्रकारे त्यांच्या काम-धंद्यावरून वेगवेगळी नावे पडली असावीत.

मन्नेरवारलू : मुलस्थान :
भारतभूमीवरील आद्य रहिवासी असलेल्या ‘नाग,’ ‘द्रविड’ सारख्या अतिप्राचीन संस्कृतींचा नेहमीच उल्लेख केला जातो. “आर्य आगमनापूर्वी या भारतात जी समृद्ध संस्कृती नांदत होती, ती नाग किंवा द्रविडीयनांची संस्कृती असल्याचे इतिहासकार सांगतात. नाग किंवा द्रविडीयनांना ‘अनार्य’ असे संबोधिले जात असे. वेदकालीन ‘अनार्य’ ‘दास, दस्यू, पणी, कुयव’ अशा नावांनी ओळखले जात असत.” असे व्यंकटेश आत्राम यांनी ‘गोंडी संस्कृतीचे संदर्भ’ सुधीर प्रकाशन, वर्धा. (पृ.१२.) या ग्रंथात म्हटले आहे. तर भाऊ मांडवकर म्हणतात- “भारतातील सर्वांत जुने रहिवासी अनार्य या नावाने ओळखले जातात. आदिम जाती किंवा आदिवासी या शब्दातही ‘भारतातील सर्वांत प्राचीन रहिवासी’ असा अर्थ अभिप्रेत आहे. भारतातील बहुतेक आदिवासी द्रविडीयन वंशाचे मानले जातात”. असे ‘कोलाम’ सेवा प्रकाशन, अमरावती. (पृ.४८.)
धर्मपूर्व काळापासून भारतभूमीवर अस्तित्त्वात असलेल्या द्रविड संस्कृतीच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक, भौतिक, चित्र, शिल्पादी आविष्कारांच्या प्रभावातून पुढे अनेक आदिवासी जनसमुदाय उदयास आले असावेत. या जनसमुदायांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक विचारधारा अस्तित्त्वात आल्या असाव्यात. या प्रवाहांतूनच विशेषतः द्रविडीयन संस्कृतीतूनच आदिवासी ‘मन्नेरवारलू’ जमात अस्तित्त्वात आली असावी. कारण ‘मन्नेरवारलू’ समाजाची भाषा ही द्रविडीयन भाषा कुळांतील अन्य भाषांशी संबंधित आहे. दक्षिणेकडील गोंड, कोलाम जमातींशी मिळती जुळती आहे. केवळ भाषाच नव्हे तर, संस्कृती, राहणीमान, जीवनपद्धती इत्यादी गोंड, कोलामांच्या संस्कृतीशी मिळती जुळती आहेत. गोंड, कोलाम आणि मन्नेरवारलू जमातीच्या बोलीभाषांमध्ये कमालीचे साम्य आढळून येते. वरील जमातींवर प्रामुख्याने त्यांच्या बोलीभाषांवर द्रविड भाषा कुळातील मराठी, तेलुगु भाषांचा प्रभाव जाणवतो. यावरून मन्नेरवारलू ही जमात स्वतंत्र आदिवासी जमात असल्याचे सिद्ध होते.
पारंपरिक स्वरुपाची निरक्षरता, संघटितपनाचा अभाव, अल्प लोकसंख्या आदि कारणांमुळे मन्नेरवारलू जमातीची सामाजिक व शासकीय स्तरावर कमालीची उपेक्षा झाली आहे. शिवाय संशोधक, अभ्यासकांनीही या जमातीकडे कायमची पाठ फिरवली आहे. परिणामी मन्नेरवारलू जमात सामाजिक, शैक्षणिक, भौतिक, राजकीय इ. विकासापासून कोसो दूर राहिली आहे. सारांश, महाराष्ट्रातील इतर आदिवासी जमातींप्रमाणे मन्नेरवारलू जमातीवर संशोधन झाले असते, तर ही जमात व तिची संस्कृती आणि सामाजिक स्थान आणि वास्तवता इतरांच्या सहज लक्षात आली असती. शासनस्तरावर देखील या जमातीची योग्यप्रकारे नोंद घेतली गेली नाही. म्हणून ही जमात आजही मुलभूत हक्कांपासून वंचित आहे. त्यामुळे ही जमात आजही विवंचनेत जगते. सामाजिक तथा राजकीय नेतृत्त्वाच्या अभावामुळे मन्नेरवारलू जमातीचा विकास झाला नाही. ही वास्तवता आहे.
महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यालगत मराठवाडा व तेलंगणा प्रदेशातील आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर आदि जिल्ह्यांमध्ये ‘मन्नेरवारलू’ जमातीचे वास्तव्य असल्याचे आढळून येते. त्याशिवाय कर्नाटकच्या काही भागात देखील ‘मन्नेरवारलू’ असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासह मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, या शहरांमध्ये ‘मन्नेरवारलू’ जमातीचे लोक आढळतात. उपजीविकेसाठी मुळ ठिकाणापासून म्हणजे जन्मभूमीपासून स्थलांतरित झालेले ‘मन्नेरवारलू’ जमातीचे लोक शहरी भागामध्ये मोठ्याप्रमानावर कायमचे स्थायिक झाले आहेत. ‘मन्नेरवारलू’ जमातीचे लोक खेड्या-पाड्यांत अधिकप्रमानावर आढळतात. जंगलात, जंगलाच्या आसपास, नदी किनारी किंवा नदीच्या आसपास या जमातीचे वास्तव्य पूर्वीपासूनच राहिले आहे. याविषयी पुढे सविस्तर चर्चा केली आहे.

मन्नेरवारलू जमातीच्या उत्पत्ती कथा :
यादरेड्डी आणि नीलिमा देवी या दाम्पत्याच्या पोटी – १) लकमारी २) मोटाटी ३) मुन्नोर ४) चौधरी ५) गुडाटी ६) कम्मा ७) चितम असे ७ मुले जन्माला आले. कालांतराने वडील यादरेड्डी एके दिवशी मुलांना जवळ बोलाऊन घेतात. थोरला मुलगा लकमारी ला म्हणतात कि, “आजपासून माझी खुर्ची तुच सांभाळ.” अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मुलगा लकमारी गोंधळात पडतो. ‘मी माझ्या बायकोला विचारून येतो’. असे म्हणून तो घरात निघून जातो. बराच वेळ परत येत नाही. सगळेजण त्याची आतुरतेने वाट बघतात. शेवटी दोन नंबरचा मोटाटी खुर्चीवर विराजमान होतो. नियमानुसार वडिलानंतर मोटाटी कारभारी होतो. वंशपरंपरागत मोटाटी च्या हाती सत्ता येते. वडील यादरेड्डीनंतर सर्व अधिकार त्याच्याकडे जातात. अशा प्रकारे मोटाटी रेड्डी –कारभारी झाला. थोरला लकमारी आणि इतर सहा भाऊ कापू म्हणजे त्याचे रक्षक झाले.
कापू / कापोल्लू म्हणजे =कावल याचा अर्थ राखण करणारा, सांभाळ करणारा, रखवालदार असा होतो. वाड (वाडू) = तो असा एकेरी उल्लेख केला जातो, तर वार (वारू) = ते असा आदरार्थी उल्लेख/ संबोध करण्याचा प्रगात आहे. आणि ‘लू’ हा प्रत्तेय अनेक वचनी संदर्भ दर्शविणारा आहे. म्हणून मुन्नुर चा पुढे मुन्नुरवाड, मुन्नुरवार आणि मुन्नेलू यावरून पुढे मन्नेरवारलू असा शब्द रूढ झाला असावा.
कालांतराने वरील सात भाऊ व्यवसाय किंवा उदरनिर्वाहाच्या निमित्ताने दुष्काळ किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे जन्मभूमी, सोडून इतरत्र पसरले. या सात भावांचा वंश वेगवेगळ्या प्रदेशात वाढत गेला. त्यांपैकीच तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ मुन्नोर किंवा मुन्नोर कापू, पुढे मुन्नेलू, मुन्नुरवाड, मुन्नुरवार, तेलगु मुन्नुर, कापेवार (कापोल्लू- शेती करणारी जमात) मन्नेवार आणि तेलगु फुलमाळी म्हणजेच मन्नेरवारलू जमातीचा वंश मराठवाड्याच्या भू-प्रदेशावर स्थायिक झाला. त्यानंतर या जमातीतील काही लोक विदर्भ, खानदेश मुंबई, पुणे, सोलापूर, इ. ठिकाणी पोटार्थी गेले असावेत. याशिवाय अन्य काही उत्पत्ती कथा सांगितल्या जातात.

मन्नेरवारलू जमातीच्या देवी देवता :-
मन्नेरवारलू जमातीच्या देवी- देवता ह्या प्रामुख्याने निसर्गाशी निगडीत असून त्यांच्या देवता ह्या उघड्यावरच असतात. यलम्मा, पोचम्मा, मरीआई (मरगेम्मा), म्हैसेम्मा, म्हसोबा, माहूर गडाची रेणुका देवी, राजेन्ना देव (महादेव), हनुमान, गणपती इ. या देवतांपैकी यल्लमा, पोचम्मा, म्हसोबा, महाकाली धुरपतमाय इ. या देवतांना नैवद्य म्हणून मांसाहार चालतो. बोललेले नवस फेडण्यासाठी किंवा गावावावरील अरिष्ठ टाळण्यासाठी या देवतांना कोंबडे, बकरे यांचा बळी दिला जातो. या प्रकाराला सन करणे किंवा कंदोरी करणे असेही म्हटले जाते. हा समाज क्वचीत वेळी प्रसंगानुसारच मांसाहार करतो. मन्नेरवारलू समाजात डुक्कर मारणे किंवा खाणे निषिद्ध आहे.
स्थलांतर :
युद्धजन्य परिस्थिती, पारतंत्र्य, स्थलांतर, भौतिक बदल, श्रमविभागणी अशा अनेक कारणांमुळे ‘मन्नेरवारलू’ जमातीच्या लोकांची इतिहासकाळात प्रचंड वाताहत झाली असावी. भटकंतीच्या काळात ते ज्या ज्या भागात वास्तव्य करत त्या त्या भागाचा, संस्कृतीचा, भाषा आणि बोलींचा त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला असावा. त्यामुळे देखील त्यांच्या जातवाचक उच्चारात वरीलप्रकारे बदल होत गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत व त्यानंतरच्या किमान दोन तीन दशकांपर्यंत तरी आदिवासी मन्नेरवारलू जमातीमध्ये औपचारिक शिक्षणाचा प्रचंड अभाव असल्याचे जाणवते. त्यामुळे देखील वरीलप्रकारे बदलत जाणाऱ्या जातीवाचक संज्ञांविषयी ते अनभिज्ञ राहिले असावेत. इतरांकडूनही अनेकवेळा ‘मन्नेरवारलू’ असा स्पष्ट उच्चार फारसा होत नसावा. किंवा काहीलोक त्यांचा जाणीवपूर्वक चुकीचा उल्लेख केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आदिवासी म्हटलं की, परंपरेने अवहेलना, उपरोध, अपमान इ. गोष्टी आल्याच. प्रस्थापितांनी तशी व्यवस्थाच करून ठेवली आहे ना. असो, आजही आदिवासीएतर बहुतांश उच्चशिक्षित लोकांना ‘मन्नेरवारलू’ हा शब्द लिहिण्यास किंवा स्पष्टपणे उच्चार करन्यास सांगितले तर ते नक्कीच गोंधळून जातात. एवढेच नाही तर या समाजातील लोकांची जी काही आडनावे आहेत; त्या अडनावांचा देखील इतरांना नीटपणे उच्चार करता येत नाही. याविषयी प्रस्तुत लेखकाने अनेकवेळा अनुभव घेतला आहे.
निरक्षरता :

सामाजिक परिवर्तन :
प्रदीर्घ सामाजिक संघर्षानंतर वर्तमानकाळात आदिवासी मन्नेरवारलू समाजातील काही डोळस व्यक्तींना शिक्षणाचे महत्त्व समजले. आपल्या समाजातील मुलं शाळेत जावीत, खूप शिकवीत असे त्यांना वाटू लागले. या हेतूने डोळसवृत्तीच्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत धाडू लागले. पण, शाळेत मुलाचे नाव घालताना मुळ प्रवेश निर्गमवर काय लिहिले पाहिजे या बाबतीत त्यांचा विलक्षण अज्ञानपणा होता. शाळेतील शिक्षकांनी आपल्या पाल्याची माहिती व्यवस्थित आणि अचूक लिहितात का ? किंवा संबधित माहिती बरोबर लिहिली जाते का ? मुलाचे नाव, आडनाव, जात, धर्म इ. अचूक लिहिले जाते का ? हे सर्व पडताळून बघण्याची किंवा स्पेलिंग तपासण्याची त्याच्याकडे बौद्धिक कुवत नव्हती, पालकांचा शाळेतील शिक्षकांवर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे वरील सर्व बाबी पडताळून घेण्याची त्यांना कधी आवश्यकताच वाटली नाही. शाळेतील शिक्षक जे काही लिहीतील, बोलतील ते सगळं त्यांच्या लेखी शिरसावंद्यच होतं.
सुरुवातीच्या काळी बहुतांश शिक्षक हे एक तर जातीने ब्राम्हण किंवा सवर्ण वर्गीय आदिवासीएतर समाजातील असायचे. विशेष म्हणजे शिक्षकांना देखील ‘मन्नेरवारलू’ असे स्पष्टपणे उच्चार करता येत नसत असे आजच्या परिस्थितीवरून सहज लक्षात येते. लेखी स्वरुपात देखील ( स्पेलिंग,वगैरे ) भरमसाठ चुका करून ठेवल्याचेही अलीकडे लक्षात येऊ लागले आहे. ही तत्कालीन शिक्षकांची अनास्था म्हणावी की, जाणीवपूर्वक केलेली चूक म्हणावी ह्याचा नेमका अंदाज बांधता येत नाही. पण या चुकांचा दूरगामी परिणाम आजच्या पिढीला भोगावा लागत आहे. मन्नेरवारलू समाजाच्या जातीच्या दाखल्यावरील अक्षम्य अशा मुद्रण दोषामुळे आज जात वैधतासाठी अनेक अडथळे उद्भवत आहेत. ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी नेमके कोण कारणीभूत असावेत ? हा प्रश्न आजही समाज मनात अनुत्तरीत आहे. जातीच्या दाखल्यावर केवळ शैक्षणिक सुविधा घेणारी ही जमात वरील प्रकारच्या इतरांनी केलेल्या चुकांमुळे शिक्षणालाही मुकावे लागत आहे. आज हजारो विध्यार्थी बेरोजगारीचे जीवन जगात आहेत. वैधता अभावी त्यांना कुठेच संधी मिळत नाही. वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या समितीनेही या समाजाकडे अनामिक अशा भावनेतून बघत आहे. या संबधीचे अनुभव कथन ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत खळकन पाणी येते. संवेदनशीलता हरवून बसलेल्या शासनाला त्यांचं दु:ख कधी कळेल ?
अशा सर्व अडचणीविषयी या समाजातील एखाद्या व्यक्तीला “तुम्ही जातीने लक्ष का दिले नाही ?” असे विचारले की, त्या व्यक्तीच्या तोंडून सहज उद्गार निघतात – “त्यावेळी आम्हा बापुड्यांना शिक्षणाचा अधिकार होताच कुठे ? स्वातंत्र्यामुळे थोडाबहुत अधिकार मिळाला पण, भौतिक सुविधा, आर्थिक पाठबळ आणि योग्य मार्गदर्शनाअभावी आम्ही रानटीच राहिलो. आम्हाला ‘शिक’ म्हणून सांगणारे समाजात शहाणे तरी कोण होते ? अशा सामाजिक परिस्थितीमुळे ‘मन्नेरवारलू’ जमातवास्तव आणि त्यांच्या मागासलेपणाची अनेक कारणं लक्षात येतात. आत्मविश्वासाचा प्रचंड अभाव, न्यूनगंड, लाजाळू स्वभाव अशी आंतरिक कारणमीमांसा पुन्हा वेगळीच. यांसारख्या अंतर्बाह्य शैक्षणिक मागासलेपणामुळे ‘मन्नेरवारलू’ जमातीचा अजूनही विकास झाला नाही. त्यांच्या मागासलेपणाची वास्तवता कोण लक्षात घेईल? सारांश, योग्य संशोधना अभावी मन्नेरवारलू जमात आजही दुर्लक्षित आहे. समाजातील आजच्या शिक्षित पिढीने ‘मन्नेरवारलू’ जमातीची सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. आज आदिवासी ‘मन्नेरवारलू’ संज्ञा रूढ झाली. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलीत झाली. पण, हा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या आजही अतिशय मागास आहे. ‘मन्नेरवारलू’ जमातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जमातीतील शिक्षित वर्गाकडून आणि शासनस्तरावरूनही अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

मन्नेरवारलू : सामाजिक स्थान :
महाराष्ट्रातील आदिवासी मन्नेरवारलू जमातीच्या संदर्भाने वाङ्मयीन किंवा संशोधनपूर्वक माहिती फारसी उपलब्ध नाही. मन्नेरवारलू जमातीच्या सामाजिक इतिहासात समाजशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्र, मानववंशशास्त्र या विषयाच्या संशोधक, अभ्यासकांनी लेखन केल्याचे आढळत नाही. या उपरांत मन्नेरवारलू समाजाविषयीची जी काही थोडीबहुत माहिती आज उपलब्ध आहे. ती माहिती समाजाच्या मौखिक परंपरेने जतन करून ठेवलेली आहे. त्या आधारे प्रस्तुत ठिकाणी मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
शासनस्तरावर देखील आदिवासी मन्नेरवारलू समाजाची फारशी दखल घेतली गेली नाही. असे दिसते. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे. च्या संशोधन विभागाकडून अजूनही आदिवासी मन्नेरवारलू समाजाबद्दल कसल्याच प्रकारचे संशोधन झालेले नाही. किंवा या समाजाविविषयी कोणत्याच प्रकारची विश्वासार्ह्य माहिती संबधित विभागात उपलब्ध नाही. जीकाही थोडीबहुत माहिती उपलब्ध आहे ती एक तर अत्यंत त्रोटक आणि नगण्य स्वरुपाची आहे. किंवा कुठल्यातरी पूर्वगृहदुषित भावनेतून वरवरची व जुजबी स्वरुपात तेही केवळ वर्णनाच्या पातळीवर लिहिले गेले. असे संबधित विभागात उपलब्ध असलेला “मुन्नेरवार / मुन्नेरवारलू जातीचा पाहाणी अहवाल -१९८२-८३” वरून लक्षात येते.

मन्नेरवारलू जमातीची संस्कृती, भाषा, चालीरिती, जीवनपद्धती, सणवार, विधी-उत्सव, व्यवसाय, राहणीमान, कथा, गीते, म्हणी, आचार, विचार इ. अन्य आदिवासी जमातींप्रमाणेच आहेत. संशोधनाच्या भाषेत सांगायचे म्हणजे, “मूळ, कुळ, कुळाचार, वेशभूषा, देवदैवते, बोलीभाषा, रडणे आणि गाणे” या मूळनिवासी आदिवासी जमातींच्या अष्टवैशिष्ट्यांशी ‘मन्नेरवारलू’ जमातीची वैशिष्टे मिळतीजुळती आहेत, परंतु मन्नेरवारलू जमातीचे वरील प्रकारे संशोधन झाले नाही. किंवा त्याप्रकारे संशोधन करण्याचा कोणी प्रयत्न देखील केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या समाजाबद्दल महाराष्ट्रातील इतर आदिवासी जमातींच्या मनात आकस व दुषित भावना निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत आहे.
महाराष्ट्रात आजमितीला अनु. जमातिच्या सुधारित यादीनुसार एकूण ४५ आदिवासी जमाती व त्या अंतर्गत जवळपास १९८ वर्गीकृत जमाती आहेत. यांतील गोंड, कोलाम, कोरकू, भिल, वारली, कातकरी इत्यादी जमातींच्याबाबतीत जे संशोधनपर किंवा ललित अंगाने लेखन झाले; त्याप्रमाणे आदिवासी मन्नेरवारलू जमातीच्या संदर्भाने झाले नाही. म्हणून या जमातीतील लोकांना जातीचा दाखला, जात वैधता अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर या जमातीविषयी सुरुवातीलाच संशोधन झाले असते तर आज या जमातीच्या सामाजिक, सांस्कृतिक पैलूंवर साकल्याने प्रकाश टाकता आला असता.

मन्नेरवारलू जमात आणि निजामकाळ :
१७ सप्टेंबर १९४८ पूर्वी मराठवाड्याच्या प्रदेशावर ‘निजामाचे’ राज्य होते. हैद्राबाद ही निजाम संस्थांनची राजधानी. या प्रदेशास हैद्राबाद संस्थान असेही म्हटले जात असत. ‘उर्दू’ ही निजामशाहीची राज्यभाषा होती. आश्चर्य म्हणजे या प्रांतात मराठी व तेलुगु भाषा बोलणाऱ्यांची संख्या ही उर्दू भाषा बोलणाऱ्यांपेक्षाही अधिक प्रमाणावर होती. तरीही उर्दू भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला होता. ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. ‘मराठवाडा’ निर्मितीबाद्दलची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे पाहाता येईल.
“प्राचीन महाराष्ट्राचे केंद्रस्थान असलेल्या मराठवाडा या संज्ञेस भौगोलिकदृष्ट्या महत्त्व आहे. मराठवाड्याचा राजकीय इतिहास पहिला की, सहज आपल्या लक्षात येते. तेलुगु बोलणाऱ्याचा तेलंगाना, कन्नड बोलणाऱ्याचा कर्नाटक तसा मराठी बोलणाऱ्याचा मराठवाडा असे नाव रूढ झाले आहे. टिपू सुलतानाने प्रथम मराठवाडा हे नाव वापरले. मात्र १८७० मध्ये मराठवाडा हे नाव राज्यकर्त्यांनी दिले. हैद्राबाद संस्थानाचा दिवाण सर सालारजंग (प्रथम) यांनी हैद्राबाद राज्याची प्रशासकीय पुनर्रचना करताना जे विभाग केले, त्यात औरंगाबाद हा स्वतंत्र विभाग केला. त्यास मराठवाडा हे नाव दिले.” (मराठवाड्यातील साहित्य, संपा. प्रल्हाद जी. लुलेकर / सतीश बडवे, कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद- २००७, पृ. ३०.)

निजामकालीन मराठवाडी जनतेचा संपूर्ण व्यवहार हा राजधानी हैद्राबाद येथूनच होत असत. ‘उर्दू’ सक्तीची असल्यामूळे मुस्लीमेतर हिंदू आणि इतर धर्मातील समाजाला ती भाषा शिकणे,बोलणे किंवा लिहिणे अपरिहार्य होते. उर्दू भाषा आणि लिपी शिवाय या परिसरात मराठी, हिन्दी, तेलुगु, कन्नड आणि इंग्रजी अशा अन्य भाषाही बोलल्या जात असत. शिवाय दख्खनी भाषा आणि ‘मोडी’ लिपी ही या प्रदेशाची वेगळी ओळख सांगता येईल. या प्रदेशाला ‘पंचधारांचा’ प्रदेश असेही म्हटले जाते. या प्रदेशातून वाहणारी गोदावरी ही मुख्य नदी तिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. गोदावरी या प्रमुख नदीसह इतर अनेक उपनद्या आहेत. विशेषतः या सर्व नद्या पूर्ववाहिन्या आहेत.
देशातील सुमारे ६५५ संस्थानिकांमध्ये निजाम संस्थान दणकट व कट्टर होते. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु हा परिसर निजामाच्या तावडीतून सुटलेला नव्हता. तो १७ सप्टेंबर १९४८ रोजी मुक्त झाला. सहजासहजी मुक्त झाला नसून केंद्र सरकारला अखेर पोलीस अॅक्शन घडवून आणावे लागले. त्यानंतर निजामाची रझाकारी संपुष्टात आली.
१ मे १९६० नंतर भाषावार प्रांतरचना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रादेशिक व भाषिक सीमा निश्चित झाल्यानंतर सीमावर्ती भागातील बहुतांश जनजीवन विस्कळीत झाले. महाराष्ट्राचा काही भाग कर्नाटक, तेलंगाना, गुजरातेत तर त्या प्रांतांचा काही भाग महाराष्ट्रात विलीन झाला. आजही बेळगावचा प्रश्न सुटला नाही.
संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा विनाअट विलीन होण्यापूर्वी मराठवाड्यातील नांदेड हा एक प्रमुख जिल्हा होता. या जिल्ह्यातील (निजाम कालीन) लोकांचे संपूर्ण व्यवहार हे मुधोळ (तेलंगाना) येथे होत असत. मुधोळ हे तालुक्याचे ठिकाण होते. प्रशासकीय स्तरावरील किरकोळ कामकाज हे मुधोळ येथेच होत असत. आणि महत्त्वाची कामे ही निजाम संस्थांची राजधानी असलेल्या हैद्राबाद येथे होत असत. भारतीय स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळी यांसारख्या घटनानंतर देशातील सामाजिक जीवन विस्कळीत झाले. देशांतर्गत भाषावार प्रांतरचना झाल्या. आणि ह्याचा सर्वाधिक परिणाम सीमावर्ती भागातील लोकांवर झाला. प्रांतीय सीमारेषा कायम झाल्यानंतर बर्याच लोकांना आपल्या मूळ ठिकाणापासून कायमचे स्थलांतरीत व्हावे लागले. स्थलांतरीतांसमोर अनेक अडचणी उद्भवतात. भाषिक अडचण ही एक फार मोठी समस्या असते. आर्थिक घडी विस्कटल्यामुळे अनोळखी प्रदेशात बस्तान बसवणे फारच अवघड जाते. रोजगार मिळत नाही. जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागतो. याशिवाय अन्य भयंकर प्रश्न असतात.
मराठवाड्याच्या प्रदेशात राजकीय व भौगौलिक बदल झाल्यानंतर येथील समाजाला स्थिरस्थावर होण्यास बराच काळ जावा लागला. पूर्वीपासूनच या परीसरात वास्तव्यास असलेला बहुतांश समाज हा बहुभाषिक किमान द्विभाषिक होता. त्यामुळे भाषेचा प्रश्न फारसा उद्भवला नसला तरी, अन्य प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यापैकीच ‘मन्नेरवारलू’ जमात होय.
‘मन्नेरवारलू’ जमात मुळची याच भागातली. शेती, शेतमजुरी, विणकाम, बांधकाम आणि किरकोळ व्यापार करणारी जमात. निजाम काळात आंध्र,आजचा तेलंगाना, कर्नाटक, आणि महाराष्ट्राचा बराच भाग एकत्रित होता. त्यामुळे अपरिहार्यपणे या समाजावर त्या-त्या भाषांचा प्रभाव पडला. मन्नेरवारलू जमातीवर तेलुगु भाषेचा अधिक प्रभाव पडला. त्यामुळे मन्नेरवारलू जमातीची भाषा ही तेलुगु मिश्रीत मराठी बनली आहे. परंतु या समाजातील काही लोक सुरुवातीच्या काळात बीड, परभणी, औरंगाबाद, मुंबई, पुणे, सोलापूर अशा ठिकाणी स्थयिक झाले आहेत, किंवा सीमावर्ती भागापासून काही अंतरावर आहेत, त्यांची भाषा मात्र मराठी आहे. हे लक्षात घ्यावे लागेल. या समाजाचा जेव्हा भाषिक अभ्यास केला जाईल, तेव्हा संशोधक- अभ्यासकांनी याविषयावर सविस्तर चर्चा करावी. अशी लेखकाची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रामध्ये बहुजन वर्गात अनु. जाती, जमाती, भटके, विमुक्त व इतर मागासवर्गीयांचा समावेश होतो. महाराष्ट्र शासनाच्या यादी नुसार अनु. जमाती या प्रवर्गाअंतर्गत एकूण ४७ जमातींचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील दुर्बल घटक विशेषतः अनु. जाती, जमातींच्या लोकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी राज्यसरकार विशेष काळजी घेते. राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुधारण्याच्या कार्याकामावर भर देण्यात येते. त्याचबरोबर राजकीय आरक्षण देखील लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर अनु. जमाती प्रवर्गातील कलमाप्रमाणे मन्नेरवारलू हि जमात २७ क्रमांकावर आहे. घटनात्मक तरतुदीनुसार या जमातीस महाराष्ट्रातील इतर आदिवासी जमातींप्रमाणेच आरक्षणाचे सर्व फायदे लागू आहेत. वर उल्लेख केल्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक भागात हि जमात वास्तव्यास असल्याचे दृष्टीस पडते. प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य लक्षणीय स्वरूपाचे आहे. ती कोलामांची उपजात नसून एक स्वतंत्र जमात असल्याचे संशोधनाअंती व शासन समितीच्या विविध निकालावरून सिद्ध होते.
मन्नेरवारलू जमातीच्या संदर्भाने जे काही वरील प्रमाणे वेगवेगळ्या शब्दात उल्लेख करण्यात येतो. त्या सर्व शब्दांसाठी मन्नेरवारलू हा एकच शब्द बहुरुढ आणि प्रचलित झाला आहे. उपरोल्लेखित सर्व शब्द प्रामुख्याने तेलुगु भाषेतून पुढे मिश्रित मराठी भाषेत अपभ्रंशीत झाल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवते. या भागावर पूर्वी निजामाचे राज्य होते. नांदेड सह हा भाग निजाम संस्थांच्या अधिपत्त्याखाली खाली होता. हैद्राबाद हे निजाम संस्थांचे मुख्य व राजकीय ठिकाण होते. पर्यायाने या संपूर्ण प्रदेशावरील समाजावर तेलुगु भाषेचा अधिक प्रभाव पडला म्हणून मन्नेरवारलू हा शब्द तेलुगु भाषेतील वेगवेगळ्या शब्दांपासून अपभ्रंश होऊन प्रचलित झाला असावा. वर उल्लेख केल्या प्रमाणे ‘लू’ हा प्रत्तेय तेलुगु मध्ये बहुवचनासाठी वापरला जातो. उदा. नेणु = मी, वालू = ते. मुन्नोर = मुन्नेल्लू किंवा मुन्नुरोलू म्हणजेच मन्नेरवारलू असे म्हणता येते. मनेवार, मुनूरवाड इ. शब्दांसाठी मन्नेरवारलू असा अनेकवचनार्थी शब्द बनला असावा. असाही एक निष्कर्ष काढता येतो.
मन्नेरवारलू जमातीची भाषा :
मराठवाड्याच्या भू-भागवर प्रदीर्घ काळापासून मन्नेरवारलू जमातीचे वास्तव्यास आहे. संस्थानिकांची एकाधिकारशाही राजवट, धार्मिक तथा राजकीय वर्चस्वामुळे मन्नेरवारलू जमातीचे अस्तित्व दुर्लक्षित राहिले असावे. या भागात हिंदी, मराठी, तेलुगु, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी तथा अशा अनेक भाषा बोलल्या जातात. नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र, तेलंगाना आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील विशेषतः सीमावर्ती भागातील समाजावर प्रामुख्याने मन्नेरवारलू जमातीवर तेलुगु- कन्नड भाषांचा प्रभाव पडल्याचे जाणवते. विशेषतः या भागातील मन्नेरवारलू जमातींच्या लोकांची मातृभाषा तेलुगु आहे. पुढे मराठवाडा मुक्त झाल्यानंतरही त्यांची भाषा तेलुगु मिश्रित मराठी अशीच राहिली आहे. या वरून मन्नेरवारलू जमातीचे भाषिक वैशिष्ट्ये लक्षात घेता त्यांची भाषा मूळ द्रविड भाषा कुळातील असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
मन्नेरवारलू जमातीचे राहणीमान :-
महाराष्ट्रातील आदिवासी मन्नेरवारलू जमातीच्या वेगळेपणाविषयी व त्यांच्या बह्यजीवनाविषयी स्वरूपावर चर्चा करत असताना पुढील अनेक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे मन्नेरवारलू समाजाचे वास्तव जीवन अत्यंत हलाखीचे आहे. दीर्घकाळ शिक्षणाच्या अभावामुळे या समाजाची सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या फारशी प्रगत झाल्याचे दिसत नाही. शिक्षणाचा वारसा नसल्यामुळे या समाजातील स्त्री- पुरुष शेती, शेतमजुरी, बांधकाम, विणकाम, गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या इ पाळणे अशा पारंपारिक स्वरुपाची कामे करत असत.
भाषा, मौखिक परंपरा, दंतकथा, आख्यायिका, कहाण्या, श्रद्धा, अंधश्रध, देऊळ, मंदिरे, प्रार्थनास्थळे, देवी देवतांना प्रसन्ना करण्यासाठीच्या विधी, गाणी, नृत्य इ., अंगात येणे, अंगारे धुपारे, स्थान महात्म्य, सणवार, उत्सव, जत्रा, यात्रा, इ. वैशिष्ट्ये, पोख व शरीररचना, उदय आणि विकास, संख्या आणि स्थान, भौगोलिक वातावरण आणि वास्तव्य, मुल ठिकाण – वास्तव्य, इतिहास आणि परंपरा, मुख्य व्यवसाय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जीवन, शिक्षणिक, राजकीय इ. वाटचाल, जन्म, मृत्यू, विधी व सणवार, स्त्री- पुरुष : राहनिमाण, स्त्रीयासंबंधीच्या, विविध विधी, मुलगी बालक झाल्याच्या विधी, विवाह पद्धती, गर्भ संस्कार, कष्टाळू, स्वाभिमानी, देवी- देवता, पापभिरू व इमानदार आहेत. कला, क्रीडा, खेळ, सोंगे, विनोद, नकला, चित्र, विणकाम, बांधकाम, गोंदण इ.
मन्नेरवारलू जमातीची स्त्री :
मन्नेरवारलू जमातीतील स्त्री आणि पुरुष यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. पुरुष अंगावर बाराबंडी धोतर घालतात तर स्त्रिया नउवारी लुगडे घालतात/ नेसतात. केसांचा बुचडा घालतात, केसांमध्ये फुले माळतात, अंगावर गोंदून घेतात, विशेषतः कंपाळावर गोंदनाचा गोल ठिपका ही मन्नेरवारलू स्त्रियांची विशेष ओळख सांगता येईल. मुलगी जन्माला आल्यानंतर सुमारे एक वर्षाची असताना तिच्या कपाळावर व शरीराच्या अन्य भागावर गोंदण्याची प्रथा आहे. सोनाराकडून कान नाक टोचून घेण्याची परंपरा आहे. अंगावर चांदीचे किंवा तत्सम धातूंचे दागिने घालतात. गळ्यात काळ्या मण्याची पोत घालतात. ऋतुमतीच्या काळात चार दिवस बाहेर राहाण्याची सामाजिक प्रथा आहे. याकाळातही स्त्रिया काबाडकष्ट करतात. नाग पंचमी, दिवाळी, शिमगा आणि सुगीच्या दिवसात मन्नेरवारलू जमातीच्या महिला गाणी म्हणतात. नृत्य करतात. दंडार नृत्य, फेरावरच्या गाणी इ. सामूहीकपणे गातात.
आदिवासी मन्नेरवारलू जमातीतील स्त्रियांचे पहिले बाळंतपण तिच्या माहेरी होते. सुईन कडून बाळंतपण करून घेतले जाते. सामाजिक जबाबदारी म्हणू सुईन हे काम मोठ्या आनंदाने पार पडते. बाळंत झालेल्या दिवसापासून पाच्या दिवशी दाई (सुईन) कोयत्याने बाळाचे नाळ कापून खड्डा करून त्यात ती नाळ पुरून टाकते. त्या शेजारी तेलाने भरलेला पेटता दिवा लाऊन ठेवतात. त्याला पाचवी असे म्हणतात. बाळंतपपणातील पहिले सात दिवस विटाळाचे असतात. बाळ आणि बाळंतीनीला शिवणं-सावणं जमत नाही. घरातील एका कोपऱ्यात बाळंतीनीचे खाट असते. खाटेच्या पायत्याला बैलांच्या शेपटीच्या केसांपासून बनवलेली दोरी बांधतात. त्यामुळे बाहेरबाधा होत नाही अशी एक समज आहे. पाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश नसे. पाचवीच्या दिवशीच बाळाचे नाव ठेवले जाते. घरातील वडीलधा-या स्त्रिया इष्ट देवताची पूजा करतात. सर्व गोत्याला आणि शेजारी असलेल्या भावकिला जेवण देतात. बाळाचे नाव ठेवण्यासाठी प्रथम मृत आजोबा, मृत वडील यांच्या नावाला प्राधान्य देवून नाव ठेवतात. जर वडील किंवा आजोबा जिवंत असल्यास इष्ट देवतांच्या नावाने किंवा आवडेल ते नाव ठेवतात. नाव ठेवण्याच्या कार्याप्रसंगाला पुरोहिताचा सल्ला घेतला जात नाही. किंवा त्याच्या मदतीने मुहूर्त सुद्धा पाहत नाहीत.
मन्नेरवारलू जमातीत लग्न करण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघेही एकाच कुळातले नसावेत असे पाहिले जाते. कारण एकाच कुळातील मुलीमुलीची लगणे होत नाहीत. म्हणजेच मुलाचे व मुलीचे कुळ वेगवेगळे असणे आवश्यक आहे. शक्यतो मामाच्या मुलीशी म्हणजेच परंतु आताच्या मुलीशी म्हणजेच आते बहिणीशी शक्यतो लग्न लावत नाहीत. जर मुलगा नवीन नात्यातील व नवीन कुळातील असेल तर त्या प्रसंगी लग्न जुळविणे साठी मुलीचे वडील व मुलीचे मामा प्रथम मुलाच्या वडिलांकडे लग्ना बाबत जातात. त्यांना मुलीची माहिती सांगून मुलीशी लग्न करणे बाबत निमंत्रण देतात. पुढे मुलाकडील मंडळी विचार

मन्नेरवारलू जमातीचे पुरुष :
वर्ण काळा-सावळा काहींचा थोडा गव्हाळ, ठेंगणा बांधा, नाक थोडेसे चपटे पण शरीरयष्टी दणकट, असलेले पुरुष अत्यंत कष्टी आणि मेहनती आहेत. त्यांची शरीरे सतत घामेजलेली असतात. बहुतेक मन्नेरवारलू जमातीचे पुरुष दाढी मिशा ठेवतात. त्याच्या चेहऱ्याची ठेवण परिसरातल्या इतर लोकांपेक्षा वेगळी आहे. त्यांचा पोशाख बाराबंडी अर्ध बह्याचा कुडता गुडघ्या पर्यंतची जाडी धोती, धोती बहुतेक पट्ट्याची असते. डोक्याला पागोटे गुंडाळतात. उपरणे किंवा छोटा फेटा बांधतात. कानात बाळी हाताला कडे सोडले तर या जमातीचे पुरुष अंगावर फारसे दागिने घालत नाहीत. विशेष प्रसंगी अथवा बाहेरगांवी जातांना डोक्यास पटका, अंगात सदरा- खमीस व धोतर घालतात. मन्नेरवारलू जमातीचे राहणीमान हे महाराष्ट्रातील इतर आदिवासी जमातींप्रमाणेच वैशिष्ट्येपूर्ण आहे.
मन्नेरवारलू जमातीच्या लोकांची घरे ही त्याच भागातील लाकूडफाटा, जंगलातील उपलब्ध वनस्पतीचे पाने, ताटवा याचा उपयोग करून बांधली जातात, झोपडीच्या भिंती कुडाच्या असतात. त्याला लागुनच छोटीशी न्हाणी असते. चार बाजूने ताटवा लावून वरचा भाग उघडा असतो.
मन्नेरवारलू जमातीचा मुख्य आहार भाकरी, चटणी, दाळ, मिरची, आंबील, हिरव्या पालेभाज्या अशा प्रकारचा शाकाहारी आहार आहे. आणि प्रसंगानुसार जंगलातील ससे, हरीण इ. प्राण्यांचे शिकार करतात. वरील प्रकारचे आहार हे वेगवेगळ्या प्रसंगी खातात. लग्नात बकरे किंवा कोंबडे कापून खातात. ससे, हरीण इ. प्राण्यांचे शिकार करतात व खातात. या बरोबर मोहाची दारू ही पितात. सणावाराला गोड- धोड जेवण करतात. त्यात पुरणपोळी, गोडभात, दहीभात, गुळापासून व गव्हाच्या राव्यापासून बनवलेला सांजा करतात. विशेषतः नागपंचमीच्या सणाला भाकरी भाजी न करता. गव्हाच्या पिठापासून बनवलेले वारणातील फळे किंवा पुरणाने भरलेले कडबू उकडून खातात.
मन्नेरवारलू जमातीचा मुख्य व्यवसाय :-
आदिवासी मन्नेरवारलू जमातीचे अस्तित्त्व इतर जमातींप्रमाणेच आदिम काळापासूनचे आहे. त्यांची मौखिक परंपरा, सणवार, विधी-उत्सव इ. वैशिष्ट्येपूर्ण आहेत. ही जमात आदिपासूनच अत्यंत कष्टाळू, पापभिरुवृत्तीची आहे. स्त्री- पुरुष बरोबरीने काम करणारे आहेत. हेवेदावे यांच्यात आजीबात नाहीत. हाती पडेल ते काम करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. काम हे काम असते. ते लहान किंवा मोठे कधीच नसते. शेती, शेतमजुरी पासून गवंडीकाम, सुतारकाम, विनकाम, कलाकुसरी, कुक्कुटपालन, शेलीपालन, दुग्धव्यवसाय अशी विविध कामे करणारी ही जमात आहे. डिंक,बिबे, गोडंबी इ. रानमेवा गोळा करून विकणे, पळसाची पाने तोडून त्यापासून द्रोण, पत्रावळ्या बनवून विकणे, तेंदूपत्ता तोडणे, आंबाड्यापासून दोरी बनवणे, गुरे-ढोरे पाळणे, मोहाची दारू काढणे, शिंदी काढणे, पिणे/ विकणे. विनकामामध्ये प्रामुख्याने ताटवे, टोपली, कनिंग, कुर्कुले, दुरड्या इ. विणणे व ते विकणे आणि त्यावर उदरनिर्वाह करणे. इ.
नोट: मन्नेरवारलू जमातीतील जिज्ञासू बांधवांना विनंती की, आपल्या समाजाविषयी जी काही माहिती आहे ती माहिती आपल्या समाजाच्या संकेत स्थळावर टाकावी. जेणे करून आपल्या समाजाची सर्वांगीण माहिती येत्या पिढीला कळेल. विशेष म्हणजे दुर्लक्षित राहिलेला आपला समाज व सामाजिक वैशिष्टे इतरांना समाजातील.
सदर लेख हा डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांच्या आगामी पुस्तकातून घेतला आहे. या लेखातील मजकूर इतरत्र वापरण्यापूर्वी लेखकाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
डॉ. वैजनाथ अनमुलवाड,
साहायक प्राध्यापक,
भाषा संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ,नांदेड. ४३१६०६, मो. ९४२१९३८८०२

Leave a Reply


SIGN INTO YOUR ACCOUNT

 
×
FORGOT YOUR DETAILS?
×

Go up